सत्शिष्य चरित्रमाला (Satshishya Biographies)
या विभागात परम पूजनीय सद्गुरु डॉ. रामचंद्र प्र. पारनेरकर महाराज यांच्या सत्शिष्यांच्या चरित्रग्रंथांचा समावेश आहे.आजपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा अभ्यास करणार्यास हे प्रकर्षाने जाणवते की, सद्गुरुंचे चरित्र पूर्णत्वाने अभ्यासणे फार कठीण वा अशक्य असेच कार्य आहे. या विभागातील चरित्रग्रंथांमध्ये गुरु-शिष्य यांच्यामधील संबंध, गुरुंनी केलेल्या कृतीतून वा गुरुंनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे वागल्याने शिष्याच्या वैयक्तिक, कौटुंबीक, सामाजिक जीवनात कोणते सुयोग्य बदल घडून आले याचा ऐतिहासिक आढावा घेण्याचा प्रयत्न विविध लेखकांनी केला आहे. ग्रंथांचे लेखन करणारे हे सत्शिष्यांच्या अगदी जवळच्या नात्यातील वा त्यांचा अधिक सहवास प्राप्त असणार्या व्यक्ति आहेत. चरित्रग्रंथांचे लेखन सर्वसामान्य, लेखनाची सवय नसणार्या व्यक्तिंकडून झाले असले तरी अभ्यासाच्या दृष्टीने हे ग्रंथ अत्यंत महत्वपूर्ण ठरतात.या सत्शिष्यांच्या जीवनचरित्राभ्यासातून सद्गुरुंचे शिष्याच्या जीवनातील संकल्पयुक्त व कृतीशील स्वरूपाचे दर्शन घडावे हासुद्धा उद्देश आहे. या विभागाचे अजून एक विशेष महत्व म्हणजे, ही सर्व चरित्रग्रंथमाला परम पूजनीय सद्गुरु विद्यासागर डॉ. विष्णुमहाराज पारनेरकर यांनी संकल्पना मांडून व त्यावर कार्य करवून घेऊन प्रकाशित केली आहे. इतिहासात सद्गुरुंनी शिष्यांची जीवनचरित्रमाला ग्रंथ स्वरूपात प्रकाशित करावी असे प्रथमच घडत असावे.